मे २ ० १ ३ मुंबई चौफेर
मातृ अवस्था दीन
' आपली संस्कृती सांगते 'मातृ देव भवः' जन्म देणारी आई हि देव समान असते, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई दुधावरची साय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, आई असते जन्माची शिदोरी सरत हि नाही उरत हि नाही'...... हे आहेत मातृदिनाचे ठीक ठिकाणी गायले जाणारे गोडवे ....जे वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, यांसारख्या अनेक स्पर्धांमध्ये भलतेच भाव खाउन जातात.... हाच स्पर्धे मध्ये भाषण ठोकणारा खाली बसलेल्या श्रोत्यांच्या टाळ्या मिळवणारा, भाषण शेवटी 'आता आईला मदत करणार ना...' असे एकदम छाप पडणारे प्रश्न विचारणारा,आणि आईच्या जीवावर बक्षीस मिळवणारा तरुण घरी गेल्यावर आईशी खरच भाषणात बोलल्याप्रमाणे वागतो का?... हा प्रश्न आपल्या स्वतःला विचारून पहा...हमखास आपल भित्र, पळकुट मन उत्तर देत " अरे नाय रे माझ माझ्या आई वर जाम प्रेम आहे" पण कधी पर्यंत जो पर्यंत ती सगळ आयत हातात देते, जो पर्यंत ती चुका पोटात घालते, जो पर्यंत दुखाची, पैसैची झळ लागू देत नाही, जो पर्यंत तिच्यासाठी काही कराव लागत नाही, तो पर्यंत जो पर्यंत तिला बाबांची पेन्शन येतेय... लागतंय ना मनाला पण सध्यातरी हेच विकोपाला जात चाललेलं समाजातील सत्य आहे....
कोणी आपल्याला विचारल " तुझी आई काय करते?'' तर आपण सहज बोलतो "घरातच असते" पण खरच आई काहीच करत नसते का?? तर नाही घरात आई एवढ काम कोणीच करत नसत ते हि कर्तव्य समजून ( त्याबदल्यात कोणत्याच प्रकारची किंमत तिला नसते) जी आई पैसेही कमावते, ऑफिस ला जाते, शेतावर जाते, ती तर कामावर जायच्या आधी घराची स्वच्छता ,जेवण बनवून , मुलांची तयारी, त्यांना शाळेत पोहचून मग ट्रेनचा प्रवास, ऑफिस मध्ये काम, पुन्हा ट्रेनचा प्रवास घरी आल्यावर किंचित सुद्धा उसंत न घेता पुन्हा जेवण आणि सगळा रगडा हा असतोच तरीही ढासळत चाललेल्या प्रकृतीचीही चिंता न करता किंबहुना दुर्लक्षच करत आई हि फक्त जगत असते नात्यांसाठी आणि फक्त आई म्हणूनच.....तिला तीच स्वतंत्र अस्तित्वच उरत नाही तिच्या कडे कोणी माणूस म्हणून पाहतच नाही ....एक साधा विचार केला तर लक्षात येत कि रोज प्रवास करून घरी आलेले आपण आई हक्काची गुलाम असल्यासारखे तिच्याशी किती वागतो आपण!!प्रत्येक गोष्टीत तिला किती कमी लेखतो आपण!! " आई तुला समजत नाय तर कशाला कटकट करते." "आई प्लीज मला माझी काम आहेत"."तू माझा विचारच करत नाहीस"." तू अशीच वागते नेहमी" हि आपली नेहमीची वाक्य रोजच्या आई वरच्या उतू जाणार्या प्रेमाचा सहज प्रत्यय देतात ...जिथे बोलण्यातून आई च्या असण्याला सन्मान नसतो तिथ तिच्या भांडी धुण्याचा, कपडे धुण्याचा, जेवण करण्याचा भार हलका करून, तिच्या शारीरिक स्वास्थ्याचा, तिच्या वैचारिक प्रगती साठीच्या प्रयत्नांचा प्रश्न तर लांबच राहतो......
मुळात जन्माआधी पासूनच समाजाने दुय्यम ठरवली गेलेल्या 'स्त्री' ला स्वतःच्या आयुष्याचे चांगले-वाईट निर्णय घेणेच नाकारले जाते अगदी तुला स्वतःचे निर्णय सुद्धा योग्य घेता येणारच नाहीत हे अगदी बिंबवल्यासारखे....मग त्यामध्ये जीवनसाथी निवडण्याचा असो किंवा गर्भ संधर्भात असोत....नवी बंधन(नाती) म्हणाली लवकर बाळ पाहिजे ती बाळ देणार,....सासू ,नवरा म्हणाला घराण्याला वारस पाहिजे ती वारस देईपर्यंत मुलीचे गर्भ चिरडत राहणार अगदी मशीन सारखी...इथे जरी तिला त्या माणसाबरोबर आयुष्य काढायचं असल, जरी ती गर्भाला जन्म देणार असली तरी तिचा निर्णय काय याचा प्रश्नच येत नाही....
हल्ली तर आईवरच प्रेम दाखवण्यासाठी facebook , wat's up सारख्या माध्यमांमुले इमाजेस, फोटोस, मेसेजेस, मातृप्रेम कविता यांची चांगलीच चलती आहे, ते हि सीजन नुसार mothersday week मधेच...मग कधी कधी तिलाही खंत वाटत असेल कि ज्या आईने मरणप्राय त्रास सहन करून जन्म दिला,जी आयुष्यभर झटतेय तिच्या पिल्लांसाठी तिच्यावरच्या प्रेमाचा उत्सव फक्त दिवसापुरताच आणि तोही एकमेकांना शुभेच्छा देण्यापुरताच मर्यादित .....प्रत्यक्ष कृतीत 'मात्र मातृ अवस्था दीन'...
मुक्ती